कानूर पठार येथे अकरा गुंठे जागा केंद्रासाठी दान; भाविकांच्या गुरुचरित्र पारायणाने परिसर भारावला
परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने आणि आदरणीय गुरुपुत्र चंद्रकांतदादा यांच्या मार्गदर्शनाखाली, पारनेर तालुक्यातील सर्व प्रमुख श्री स्वामी समर्थ केंद्रांवर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवास (सप्ताह) गुरुवार, दिनांक ९ एप्रिल २०२६ पासून अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. या महोत्सवात तालुक्यातील कानूर पठार येथील विशेष दातृत्वाची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. डॉ. चंद्रशेखर सोनवळे यांचे दातृत्व आणि ग्रामस्थांचे श्रमदान या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे कानूर पठार येथील ग्रामस्थ डॉ. श्री. चंद्रशेखर सोनवळे साहेब यांनी श्री स्वामी समर्थ केंद्रासाठी आपली स्वमालकीची ११ गुंठे जागा दोन महिन्यांपूर्वी दान केली आहे. या जागेवर नियोजित भव्य स्वामी समर्थ केंद्राची स्थापना होणार आहे. या पवित्र कार्यासाठी गावातील भाविक आणि सेवेकऱ्यांनी जेसीबीद्वारे जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी भव्य मंडप उभारला आहे. या नूतन जागेवर गुरुवार, ९ एप्रिलपासून सुमारे ५० हून अधिक भाविक श्री गुरुचरित्र पारायणास बसले आहेत. या धाडसाबद्दल आणि सेवावृत्तीबद्दल परमपूज्य गुरुमाऊली आणि आदरणीय चंद्रकांतदादा यांनी कानूर पठार येथील ग्रामस्थांचे व सेवेकऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे. विविध आध्यात्मिक सेवांचे आयोजन पारनेर मुख्य केंद्रासह शिरूर शहरातील बाबुरावनगर,कानूर पठार, सुपा, पानोली, जवळा, निघोज, वाडेगव्हाण, पळवे, अळकुटी आणि राळेगण सिद्धी या सर्व प्रमुख केंद्रांवर भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सप्ताहाच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र पारायण, स्वामी चरित्र पारायण, दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती, नवनाथ पारायण, भागवत पारायण आणि श्री स्वामी समर्थ नामाचा सामूहिक जप अशा विविध सेवा अहोरात्र सुरू आहेत. तसेच ठिकठिकाणी होम-हवन आणि धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.भाविकांना दर्शनाचे आवाहन या पुण्यतिथी सप्ताहाच्या निमित्ताने पारनेर तालुक्यातील सर्व भाविकांनी या मंगलमय सोहळ्यात, महाप्रसादात आणि विविध सेवांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वामी महाराजांचा कृपाप्रसाद घ्यावा, असे आवाहन पारनेर तालुक्यातील सर्व केंद्रांमधील सेवेकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.