मुंबई कांदिवली पश्चिम येथील धनगर समाजाचे जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना पुण्यश्लोक अहिल्या समाज भूषण गौरव पुरस्कार २०२५ साठी नुकतीच निवड झाली असल्याचे निवड पत्र समृद्धी पब्लिकेशन सिंधुदुर्ग अध्यक्ष प्रा.डॉ.बी.एन.खरात यांनी निवड पत्राद्वारे भारत कवितके यांना कळविले आहे.अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त अहिल्या भीम पर्व या कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन, सन्मान सोहळा,गजल कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.भारत कवितके यांच्या कार्याचा गौरव म्हणून सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
सामाजीक क्षेत्रातील भारत कवितके यांचे कार्य उल्लेखनीय आहे.रुग्णांना रुग्णालयातील सेवेसाठी तत्पर हजर,एस.आर.ए.कामातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील, विभागात विविध शिबीरांचे आयोजन, शासनाच्या विविध योजनांचा तळागाळातील लोकांपर्यंत फायदा मिळवून देणे, सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे,अशा विविध सामाजिक उपक्रमात भारत कवितके अग्रेसर असतात.नुसती वळवळ न करता चळवळीने आंदोलनाने त्यांनी अनेक सामाजिक समस्या सोडविल्या आहेत.त्यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली असून सर्वच पुस्तकांना राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, त्यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाचे आत्मचरित्र आयुष्य उसवताना हे सध्या सर्वत्र गाजत आहे.एकूण १० गाणी युट्यूबवर वर धुमाकूळ घालत आहेत, रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहेत.अनेक चैनलवर, दैनिकात, भारत कवितके यांचे लिखाण सातत्याने प्रसिद्ध होत आहे.हा पुरस्कार भारत कवितके यांना १ जून २०२५ रोजी सकाळी ११वाजता बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन स्मारक , सिंधुदुर्ग जिल्हा बँक जवळ, ओरोस , सिंधुदुर्गनगरी, तालुका कुडाळ या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते भारत कवितके यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कार निवडी नंतर भारत कवितके यांनी प्रतिक्रिया दिली की,” पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० जयंतीनिमित्त मला हा पुरस्कार मिळत असल्याचा एक वेगळाच आनंद मिळतो आहे.
या पुरस्काराने माझी समाजाप्रती आणखी जबाबदारी वाढली आहे.याची मी जाणीव ठेवून सामाजिक क्षेत्रात काम करीत राहिन” भारत कवितके यांना या पुरस्कारासाठी निवड झाली हे कळताच समाजाच्या विविध स्तरातील लोकांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.