-बिहार सरकार व राष्ट्रीय साखर कारखाना महासंघामध्ये सामंजस्य करार
पुणे जिल्हा प्रतिनीधी:संतोष भरणे
इंदापूर – बिहार राज्यातील साखर कारखानदारीला सामंजस्य करारामुळे शाश्वतता, कार्यक्षमता तसेच शेतकऱ्यांसाठी समृद्धी व विकासाचे नवे पर्व सुरु होत आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाशी झालेल्या सामंजस्य करारामुळे बिहार राज्यातील साखर कारखानदारीची प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पाटणा येथे सोमवारी (दि. 30) काढले. बिहारची राजधानी पाटणा येथे बिहार सरकारचा ऊस उद्योग विभाग आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराच्या स्वाक्षरी कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी बिहारचे ऊस उद्योग विकास मंत्री संजय कुमार, अप्पर मुख्य सचिव के. सेंथिल कुमार, जयप्रकाश नारायण सिंह, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे उपाध्यक्ष केतनभाई पटेल, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, मुख्य ऊस सल्लागार आर. बी डाॅले व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे संचालक मंडळ उपस्थित होते. बिहार सरकारच्या ऊस उद्योग विभागाच्या “समृद्ध उद्योग – सशक्त बिहार” या योजनेअंतर्गत राज्यात ऊस विकास आणि विस्तारासाठी तसेच ऊसावर आधारित उद्योग उभारण्यासाठी करण्यात आलेल्या या करारामुळे प्रगतीचा पुढील टप्पा सुरु होत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणाच्या प्रारंभी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाकडे बिहार राज्यातील प्रस्तावित 2 नवीन साखर युनिट्सच्या स्थापनेसाठी ऊस व्यवहार्यता अहवाल (CFR) आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. आमच्या टीमने हे काम विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ ही भारतातील सहकारी साखर कारखान्यांची सर्वोच्च राष्ट्रीय संस्था असून, तिच्याकडे ऊस विकास, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक ज्ञानाचा अनेक दशकांचा अनुभव आहे. बिहारच्या साखर उद्योगाच्या शाश्वत ऊस विकास कार्यक्रमासाठी मार्गदर्शक संस्था म्हणून काम करण्याची महत्त्वाची जबाबदारी राष्ट्रीय महासंघावर सोपवण्यात आली आहे. राष्ट्रीय महासंघ बिहारमधील सर्व साखर कारखान्यांमधील ऊस विकास कामांसाठी तज्ज्ञ नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे. राष्ट्रीय साखर महासंघ मार्गदर्शक संस्था म्हणून संपूर्ण साखर मूल्य साखळीमध्ये बिहार राज्य सरकारला व्यापक तांत्रिक मार्गदर्शन आणि धोरणात्मक सहाय्य करेल. आमच्या कामकाजामध्ये ऊस विकास, उत्पादकता वाढ आणि साखर उद्योगाचे आधुनिकीकरण या प्रमुख क्षेत्रांचा समावेश राहणार आहे. आमचा दृष्टिकोन शेतकरी-केंद्रित असेल, ज्यामुळे विकास प्रक्रिया शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य राहील. बिहार सरकारच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे ऊस लागवडीचा विस्तार करणे तसेच बंद पडलेल्या साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवित करणे याकरिता राबविलेल्या धोरणांचा हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात उल्लेख केला. देशाचे गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या सक्षम नेतृत्वाखालील देशातील सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या यशासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी शुभेच्छा देत बिहार सरकारला धन्यवाद दिले.
•चौकट :-
मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे हर्षवर्धन पाटील यांनी मानले आभार!
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वाची प्रशंसा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने साखर उद्योगाचे पुनरुज्जीवन करणेसाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करणेसाठी सक्रिय पावले उचलली आहेत, त्याबद्दलही हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार व बिहार सरकारचे आभार मानले.
•चौकट:-
हर्षवर्धन पाटील यांची बिहारच्या मुख्य सचिवांशी चर्चा !
राजधानी पाटणा येथे बिहारचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करीत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची भेट घेतली व साखर उद्योग संदर्भात चर्चा केली. याप्रसंगी बिहार राज्यातील ऊस उत्पादन, सहकारी संस्था व नवीन सहकारी साखर कारखाने सुरू करणे आदी संदर्भात चर्चा झाली. तसेच बिहार सरकारला साखर उद्योगाचा विकासासाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही या भेटीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी दिली. दरम्यान, पाटणा दौऱ्यामध्ये बिहारचे सहकार व ऊस विकास मंत्रालय आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने साखर व ऊस उद्योगासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन केले.
फोटो:-पाटणा येथे राष्ट्रीयसहकारी साखर कारखाना महासंघ व बिहार सरकार यांच्यातील सामंजस्य कराराच्या कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन पाटील. यावेळी व्यासपीठावर बिहारचे ऊस उद्योग विकास मंत्री संजय कुमार व मान्यवर.