आजच्या तंत्रज्ञानाच्या स्पर्धेच्या युगात शालेय शिक्षणाबरोबरच मैदानी खेळाचे महत्व लक्षात घेता आज सुजाता इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सुजाता मॉडर्न कॉलेज ऑफ बीसीए मध्ये भव्य प्रांगणात आज सिने अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते बास्केटबॉल मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री. किरण सोनवणे सर उपस्थित होते. पूजा सावंत यांचे स्वागत शाळेच्या संचलन पथकाने केले त्याचप्रमाणे बाल छोट्या चिमुरड्यांनी गुलाबपुष्प देऊन हस्तांदोलन करून केले. प्रमुख पाहुणे स्थानपन्न झाल्यावर आद्य कर्तव्य म्हणून पूजा सावंत यांचा सन्मान शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती उमा बऱ्हाटे यांनी केले. वात्सल्य प्रतिष्ठान अंतर्गत उभारण्यात आलेल्या शैक्षणिक संकुलात आज रोजी सुजाता इंटरनॅशनल स्कूल, सुजाता जुनियर कॉलेज, सुजाता सीबीएसई स्कूल, त्याचप्रमाणे मॉडर्न कॉलेज ऑफ बीसीए इत्यादी शाखा आहेत. आजच्या मोबाईलच्या जमान्यात मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासाची सुद्धा खूप गरज आहे. मैदानी खेळ आजच्या पिढीत लोप पावत चालले असतानाच विद्यार्थ्यांची मैदानी खेळाबद्दलची जिज्ञासा, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मनांचा मेळ आणि मातीतील खेळ ही संकल्पना संस्थापक श्री किरण सोनवणे सर यांनी अचूक हेरली, विद्यार्थ्यांच्या खेळाडू वृत्तीचा वेध घेऊन त्यांनी सुजाताच्या प्रांगणात भव्य दिव्य क्रीडांगणाची निर्मिती केली. यामध्ये खो-खो, कबड्डी, भालाफेक, उंच उडी, लांब उडी, क्रिकेट, कुस्ती, बास्केटबॉल इत्यादी खेळासाठी प्रशस्त अशी मैदानाची सुविधा उपलब्ध करून दिली. जणूकाही विद्यार्थ्यांच्या खेळाडू वृत्तीला एक मनसोक्त व्यासपीठाचीच निर्मिती केली. त्यामुळेच मैदानी स्पर्धेत देखील विद्यार्थ्यांनी सुजाताच्या शिरपेच्यात मानाचा तुरा गुंफण्याचे अनमोल कार्य सिद्धीस नेले. सुजाताच्या विद्यार्थ्यांनी भरीव कामगिरी करताना तालुका, जिल्हा, राज्य, विभागीय पातळीवर चमकदार कामगिरी केली. संस्थापक किरण सरांच्या कार्याची हीच खरी पावती आहे,हे म्हणणं वावगं ठरणार नाही. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील तरुण कुठल्याही सोई सुविधांपासून वंचित राहू नये, आणि त्यांना प्रोत्साहन देण्यामागची हीच किरण सरांची दूरदृष्टी असावी यात तीळ मात्र शंका नाही. सन्माननीय संस्थापक श्री किरण सोनवणे सर यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली हॉलीबॉल क्रीडांगणाचे कार्य पूर्णत्वास गेले. त्यांनी आश्वासनापेक्षा कृतीला जोड देऊन बारा लाख रुपये खर्च करून हे देदीप्यमान बास्केटबॉल क्रीडांगण सत्यात उतरवलं सर्व बारकावे लक्षात घेऊन हे भव्य बास्केटबॉल क्रीडांगण उभारण्यात आलं.
आज” सालबर्डी” चित्रपट अधीर मन झाले या गीताची फेम अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी त्या बोलताना म्हणाल्या शाळेचा निसर्ग रम्य प्रशस्त परिसर पाहून क्षणभर मीही भारावून गेले. पुढे त्या म्हणाल्या ग्रामीण भागातून खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतात ग्रामीण भागातील सुजाताचा हा उपक्रम वाखण्याजोगता आहे. त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करून करून शालेय उपक्रमाचे, निसर्गरम्य परिसराचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक बालगोपाळ चिमूरड्यांना देखील अभिनेत्री बरोबर सेल्फीचा ( स्वयं चित्रांकनाचा ) मोह आवरता आला नाही. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांचं नावाजलेलं गीत अधीर मन झाले हे गीत गुणगुणत निरोप दिला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकीर उमटली नसेल तर नवलच नाही का ? हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सुजाता फॅमिलीच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे निवेदन शाळेचे शिक्षक श्री. संदीप चौधरी सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार शालेय शिक्षिका श्रीमती स्वाती गडाख यांनी केले.