सौंदाळा (ता. नेवासा) – ११ जून २०२५: मूळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालय, सोनई येथील कृषिदूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) अंतर्गत सौंदाळा गावात Participatory Rural Appraisal (PRA) म्हणजेच सहभागी ग्रामीण मूल्यांकन हा कार्यक्रम राबवत शेतकऱ्यांमध्ये शाश्वत शेती आणि ग्रामविकासाबाबत व्यापक जनजागृती केली.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विशेष आकर्षक पद्धतीने रांगोळीच्या माध्यमातून गावाचा नकाशा, पिकांची पद्धत (Cropping Pattern), मृदा प्रकार (Soil Pattern) आणि गावातील उपलब्ध संसाधनांची माहिती सादर केली. रांगोळीद्वारे साकारलेले नकाशे पाहून शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि त्यांच्या शंका विद्यार्थ्यांनी तत्परतेने दूर केल्या.
यावेळी शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या मृदा प्रकारांचे वैशिष्ट्य, त्यानुसार पीक निवड, जलसंधारणाचे महत्त्व, सेंद्रिय आणि समतोल खत व्यवस्थापन तसेच नैसर्गिक शेतीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गावातील शेतांमधील प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे कृषिदूतांनी शाश्वत शेतीच्या तंत्रज्ञानावर चर्चा केली.या कार्यक्रमासाठी गावातील अनेक शेतकरी, ग्रामस्थ, सरपंच श्री. शरद आरगडे, ग्रामसेविका प्रतिभा पिसोटे यांची उपस्थिती लाभली. शेतकऱ्यांनी उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला, यामुळे पर्यावरण आणि शेतीविषयक जाणीवसंपन्नता गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली. हे PRA उपक्रम कृषिदूत भावेश बागुल, रितेश मराठे, स्नेहांशू मोहिते, प्रशांत लगड, अभिजित कदम, साहिल कुंभारे यांच्या माध्यमातून यशस्वीरित्या राबवले गेले. या कृषिदूतांना प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य प्रा. सुनील बोरुडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल दरंदले आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकृष्ण हुरुळे यांचे मार्गदर्शन लाभले. संपूर्ण आठवड्यात विविध उपक्रमांद्वारे गावकऱ्यांमध्ये कृषी व पर्यावरणविषयक जागृती केली जात आहे.