बाडमेर जिल्ह्यातील बोर चरणन गावातील शेतकरी वडिलांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. त्यांनी कर्ज काढून आपल्या मुलाला मेडिकलच्या शिक्षणासाठी अहमदाबादला पाठवलं पण नशिबाने काही वेगळंच ठरवलं होतं. १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान ए१७१ उड्डाणानंतर काही वेळातच कोसळलं. या अपघातात जयप्रकाशचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी जयप्रकाश बीजी मेडिकल कॉलेजच्या मेसमध्ये जेवत होता.
जयप्रकाश चौधरी बीजी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. त्याची परीक्षा १६ जूनपासून सुरू होणार होती. त्याचे वडील धर्मराम शेती आणि मजूरीचं काम करतात. त्यांनी कर्ज घेऊन मुलाला वैद्यकीय शिक्षणासाठी कोटा येथे पाठवले होते. कोटामध्ये २ वर्षे तयारी केल्यानंतर तो नीट परीक्षा उत्तीर्ण झाला आणि अहमदाबादला अभ्यासासाठी गेला. तो २०२३ पासून अहमदाबादमधील मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होता.