बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव हद्दीत असलेल्या आणि भाविकांचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या मच्छिंद्रनाथ (मायंबा) गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लुटणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अंभोरा पोलीस ठाणे आणि बीड स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तरीत्या ही धडाकेबाज कारवाई केली असून, गेल्या पंधरा दिवसांतील अंभोरा पोलिसांची ही दुसरी मोठी यशस्वी कामगिरी ठरली आहे. या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील पाथर्डी येथील एका गुन्हेगारी टोळीने गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लक्ष केले होते. ही टोळी गडावरील गर्दीचा फायदा घेत असे. विशेषतः महिला भाविकांना गर्दीत धक्काबुक्की करणे, त्यांना बातोंबातोंमध्ये गुंतवून ठेवणे किंवा गर्दीचा गैरफायदा घेत गळ्यात हात टाकून अतिशय चलाखीने दागिने लंपास करणे, अशी या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत होती. याप्रकरणी १९ डिसेंबर २०२५ रोजी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस या सराईत गुन्हेगारांच्या मागावर होते. तपासादरम्यान सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गडावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तसेच गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवली. या तांत्रिक आणि मानवी माहितीच्या आधारे पोलिसांनी पाथर्डी येथील सुधीर कराळे या संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या पाच साथीदारांच्या मदतीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली. सध्या मुख्य आरोपी पोलिसांच्या कोठडीत असून पोलीस त्याच्या इतर फरारी साथीदारांचा शोध घेत आहेत.
या कारवाईमुळे देवस्थान परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशस्वी मोहिमेमध्ये पोलीस हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, आदिनाथ भडके, हरिभाऊ बांगर, कृष्णा नरवडे आणि जयराम उबे या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.