माळवाडी (बोटा), ता. संगमनेर — श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माळवाडी गावातून विद्यार्थ्यांनी काढलेल्या तिरंगा रॅलीने झाली. ग्रामस्थांनी या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “हर घर तिरंगा” ही संकल्पना यातून ठळकपणे मांडण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी रॅगिंग विरोधातील मोहिमेचे सुद्धा यावेळी आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पोखरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. अमित पोखरकर, इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. केशव आरोटे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल देशमुख, श्री बाळकृष्ण कोकाटे, डॉक्टर अग्रवाल तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी अध्यक्षांनी शिक्षणाचे महत्त्व, संस्थेतील विविध सुविधा याबद्दल मार्गदर्शन केले. “शेतकऱ्याची मुलगी शिकलीच पाहिजे, ती उच्च पदावर पोहोचली पाहिजे हा आमचा ध्यास आहे” असे ते म्हणाले. तसेच “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पुणे-मुंबईच्या तोडीचे शिक्षण, ट्रेनिंग, प्लेसमेंट, नोकरीच्या संधी आणि अद्ययावत विषयांवरील मार्गदर्शन संस्थेमध्ये उपलब्ध करून दिले जात आहे” असेही त्यांनी अभिमानाने नमूद केले.
इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. केशव आरोटे यांनी “विद्यार्थ्यांचा धर्म म्हणजे पंथ नसून अभ्यास करणे आणि देशाची सेवा करणे हाच आहे” असे प्रतिपादन केले. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अमोल देशमुख यांनी सीमेवरील शहीदांचे बलिदान देशासाठी अमूल्य असल्याचे सांगून “ऑपरेशन सिंदूर” या मोहिमेचेही विशेष कौतुक केले. आभार प्रदर्शन श्री. बाळासाहेब शेळके यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या पार पाडले. संस्था शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्यातही आघाडीवर असून, यावर्षीही माळवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. “रक्तदान हे श्रेष्ठदान असून, याचा उपयोग सैनिक व गरजू रुग्णांना होणार आहे”, असे सचिव डॉ. अमित पोखरकर यांनी सांगितले. शेकडो रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले असून, यात महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय आणि उत्साहवर्धक होता.
या दिवशी अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते. अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पोखरकर यांच्या हस्ते आमदार डॉ. किरण लहामटे यांचा सत्कार करण्यात आला. आमदार लहामटे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच समाजसेवेची जाणीव देण्याच्या संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कीर्तन, महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जन्माष्टमी सोहळ्याचे धर्मध्वज रोहन माननीय शिवाजीराव पोखरकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. आश्रमातील मान्यवर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांची यावेळी अलोट गर्दी जमली होती. श्री स्वामी समर्थ संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व माळवाडी ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्याने झालेल्या या बहुआयामी सोहळ्यात देव, देश आणि धर्म यांचा अभूतपूर्व संगम अनुभवायला मिळाला.