अनुसूचित जातींच्या अंतर्गत असलेल्या विषमतेच्या प्रश्नावर मातंग समाजाने थेट राजधानी गाठत मोठा लढा उभारला आहे. २३ मार्च रोजी जंतर-मंतर मैदान येथे होणाऱ्या ‘मातंग आक्रोश मोर्चा’साठी राज्यभरातून मातंग समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत.या आंदोलनाचा केंद्रबिंदू म्हणजे अनुसूचित जातींचे ‘अ, ब, क, ड’ असे वर्गीकरण. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी आता मातंग समाज आक्रमक झाला असून, संसाधनांचे न्याय्य वाटप व्हावे, ही प्रमुख भूमिका या मोर्चामागे आहे.बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातून सुमारे २५ हजार कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत. राज्यमंत्री प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनाला वैचारिक दिशा मिळाली आहे.मोर्चात अण्णाभाऊ साठे आणि लहुजी वस्ताद साळवे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याची मागणीही ठळकपणे मांडली जाणार आहे. तसेच अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडकपणे लागू करावा, अशीही मागणी आंदोलकांकडून करण्यात येणार आहे.
यासोबतच बोधेगाव येथे अण्णाभाऊ साठे व अमर शेख यांच्या स्मारकासह सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणीही करण्यात येणार आहे.एकूणच, मातंग समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिल्लीकडे रवाना झाल्याने या ‘मातंग आक्रोश मोर्चा’कडे देशाचे लक्ष लागले असून, सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.