पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने वार करत व लाकडी दांडक्याने दगडाने मारहाण करुन ठार मारल्याची घटना नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे २२ जूनला दुपारी १.३० ते २.३० च्या सुमारास घडली. बळीराम देविदास शिंदे (वय २८, रा. गुंडेगाव, ता.नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. खुन करणाऱ्या आरोपींना नगर तालुका पोलिसांनी सुप्याजवळ पाठलाग करून पकडले.राहुल दिलीप राऊत, डॅनियल येशुदास जावळे (दोघे रा. गुंडेगाव, ता. नगर) व सोन्या उर्फ अमोल भुजबळ (रा. वडगाव तांदळी, ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत मयताचा भाऊ लक्ष्मण देविदास शिंदे (वय ३१, रा. गुंडेगाव, ता. नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मयत बळीराम याचे गावातीलच राहुल राऊत व डॅनियल जावळे यांच्याशी पूर्वी वाद झालेले होते. बळीराम हा त्याच्या स्विफ्ट कारमधून गावातील छत्रपती चौक येथे २२ जून रोजी दुपारी आई, वडिलांना आणण्यासाठी व किराणा माल घेण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी या आरोपींचे व त्याचे वाद झाले. त्यातील एका आरोपीने बळीराम बळीराम याच्यावर चाकूने वार केल्याने तो जखमी झाला. त्यामुळे त्याने तेथून पळ काढत उपचारासाठी नगरला स्विफ्ट कार मधून निघाला. आरोपींनी त्याचा डॅनियल जावळे याच्या स्विफ्ट कारने (क्र. एमएच १६ बी एम ८३०२)ने पाठलाग सुरु केला. गुंडेगाव ते देऊळगाव रस्त्यावर उतारवाट येथे वळणावर आरोपींनी त्यांची कार आडवी लावून बळीराम यास अडवले. त्यानंतर त्याला गाडीच्या बाहेर काढून मारहाण सुरु केली. त्यातील एकाने चाकूने त्याच्या डोक्यात, पायावर, हातावर, तोंडावर वार बेशुद्ध पडला.
त्यानंतर आरोपींनी त्याच्या कारवर दगड टाकून कारची तोडफोड केली व तेथून निघून गेले. रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी झालेल्या बळीराम यास उपचारासाठी नगरला जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे शिंदे (मयत) केले. त्यामुळे तो गंभीर जखमी होवून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.यानंतर अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक अमोल भारती नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी करून आरोपींचा शोध सुरु केला. दरम्यान आरोपी हे पुण्याच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळताच स.पो.नि. गिते यांनी तातडीने उपनिरीक्षक उमेश पतंगे यांच्या नेतृत्वाखालील एक पथक पुण्याच्या दिशेने रवाना केले. या पथकाने सुप्याच्या पुढे पाठलाग करत तिन्ही आरोपींना पकडले आहे. या तिघांच्या विरुद्ध बीएनएस कलम १०३ (१), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास स.पो.नि. गिते हे करत आहेत.