दि. २२ जुलै २०२५, निघोज (ता. पारनेर) निघोज गावात एका निष्पाप बैलाला जिवंत पेटवून देण्याच्या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एका व्यक्तीच्या वैयक्तिक रागातून बैलाची निर्घृण जाळपोळ करण्यात आली. या घटनेमुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून मुक्या प्राण्याच्या न्यायासाठी आता गावकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
शिवबा संघटनेचे अनिल शेटे यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी “त्या बैलाला न्याय मिळालाच पाहिजे!” असा ठाम निर्धार केला आहे. संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की जर या प्रकरणात तातडीने गुन्हेगारावर कठोर कारवाई झाली नाही, तर रास्ता रोको आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल.
गावकऱ्यांचा सवाल आहे – “माणसाच्या अन्यायासाठी आवाज उठतो, पण मुक्या बैलासाठी कोण लढणार?” या प्रकाराचा निषेध करत निघोजकरांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावातील अनेक तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यात संतापाचे वातावरण असून सगळ्यांचा एकच निर्धार – महादेवाच्या नंदीला न्याय मिळालाच पाहिजे.लवकरच या आंदोलनाची वेळ, तारीख आणि ठिकाण जाहीर करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.