सोनई, ता. 27 : शनैश्वर देवस्थानमध्ये बनावट अॅप, बनावट क्यूआर कोड आणि बनावट पूजाविधीद्वारे शेकडो कोटींचा अपहार झाल्याचा आरोप आहे. शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये वर्षानुवर्षे सत्ता गाजविणाऱ्या काही पुरोहितांच्या दुसऱ्या पिढीने हा सगळा गेम प्लॅन तयार केल्याच्या चर्चा आहेत. अहिल्यानगर पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट मंत्रालयात जाऊन या प्रकरणाचा पाठपुरावा केला. आता भाजपचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे या प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला आहे. येत्या 3 जुलैला शेटे यांना या प्रकरणात म्हणणे मांडण्यास बोलविण्यात आले आहे.
अहिल्यानगर सार्वजनिक न्यास नोंदणी निरीक्षक यु. व्ही. जाधव यांनी याबाबत शेटे यांना पत्र दिले आहे. भाजपचे नेते ऋषिकेश शेटे यांना त्यांचे म्हणणे व पुरावे सादर करण्यासाठी 3 जुलैला बोलविण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे. दरम्यान, शनिशिंगणापूर अॅप, क्यूआर कोड घोटाळ्यात अनेक बडे मासे सहभागी असल्याच्याही चर्चा आहेत. पोलिस व धर्मादाय आयुक्त यांच्याकडून नेमकी कशी चौकशी होते? बडे मासे गळाला लागतात काय? या अॅप घोटाळ्याचा मास्टरमाईंड गजाआड होणार का? हे प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत.
शनिशिंगणापूर देवस्थानमधील काही पुजाऱ्यांच्या दुसऱ्या पिढीने हा घोटाळा केल्याच्या चर्चा आहेत. एका पुजाऱ्याच्या जावयाचा यात हात असल्याचे बोलले जात आहे. शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये काही संबंध नसताना या जावईबापूने शनिशिंगणापूरात आपली दहशत बसवली. काही कर्मचारी व पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट अॅप तयार केले. देश-विदेशातील भाविक व सेलिब्रीटी या सासरा-जावयाने मिळून टार्गेट केल्याचे बोलले जात आहे. या सासरा व जावयाच्या संपत्तीची चौकशी व्हावी व गेल्या 10 वर्षांतील त्यांच्या बँकेतील ट्रान्झेक्शनची चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
पुजाऱ्यांची लाईफस्टाईल पहा न्यायालय किंवा पोलिस गुन्ह्यातील पुरावे मागतात. वास्तविक, गेल्या पाच- दहा वर्षांत या पुजाऱ्यांची त्यांच्या नातलगांची बदललेली लाईफस्टाईलच या गोष्टीचा सर्वात मोठा पुरावा आहे. कोट्यवधींचे बंगले, जमीनी, प्लाँट, प्लॅट, महागड्या गाड्या, घरच्या लग्नात केलेली लाखोंची उधळपट्टी हे सगळं बोलकं आहे. या पुजाऱ्यांची दुसरी पिढी वर्षांतून कित्येक वेळा देश-विदेशातील ट्रिपा अॅरेंज करते. या पुजाऱ्याचे कुटुंब वर्षाला लाखोंची उधळपट्टी करतंय. मग हे पैसे येतात कोठून? शनिशिंगणापूर देवस्थान यांना किती पगार देतंय? हे सगळं सायबर पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर पोलिसांना शोधायला हवं, असं बोललं जात आहे.