जिवंत व्यक्ती मयत दाखवून बनावट सातबारा उतारा व दस्त नोंदणी:सामाजिक कार्यकर्ते विष्णू गायकवाड यांच्या तक्रार अर्जातून घटना उघड-करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करमाळा तालुका प्रतिनिधी:सुशिल नरोटे
सोलापूर : करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू गायकवाड यांनी दाखल केलेल्या तक्रारी अर्जातून बनावट सातबारा उतारा आणि बनावट दस्त नोंदणी प्रकरण उघडीस आल्याने, महाराष्ट्राच्या महसूल क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत करमाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील ‘दुय्यम निबंधक’ या पदावर कार्यरत असणारे अरविंद सुर्यकांत कोकाटे यांच्या फिर्यादीवरून बनावट सातबारा व दस्तनोंदणी केल्याबाबत पाच जणांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हकीकत अशी की, दिनांक ११/७/२००७ रोजी करमाळा दुय्यम निबंधक श्रेणी १, येथील कार्यालयात शेती गट नंबर ३९४ या जमिनीचा खरेदी दस्त क्रमांक २४१०/२००७ हा तयार करताना लिहून घेणार नामे शोभा तानाजी खुळे रा. काकडे गल्ली, रा करमाळा आणि लिहून देणार सुमतीबाई सुर्यकांत गायकवाड (सध्या मयत), पुरुषोत्तम सुर्यकांत गायकवाड, रजनीकांत सुर्यकांत गायकवाड, संजय सुर्यकांत गायकवाड हे सर्व राहणार वडाळा तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर या सर्वांनी, शेती गट नंबर ३९४ याच जमिनीच्या सातबारा उतारा मधील सहहिस्सेदार रमेश (छब्बु) शांताराम गायकवाड, वत्सलाबाई दयानंद सोनावणे, चंद्रलिला वसंत साळवे हे जिवंत असताना ते मागील १० ते १५ वर्षापासून मयत झाले असल्याचे दाखवून, तत्कालीन तलाठी यांचेमार्फत शेती गट नंबर ३९४ जमिनीचा सातबारा उतारा बनावट व बेकायदेशीर तयार करून, दस्त क्रमांक २४१०/२००७ अनव्ये जमीनीचा खरेदी- विक्री व्यवहार केला होता. मात्र सदर जमीनीचा दस्त नोंदणी करताना जोडण्यात आलेला सातबारा उतारा हा खरेदी घेणार शोभा तानाजी खुळे यांनी त्यांचे पती हे पोथरे (तालुका करमाळा) या गावाच्या सज्जात तलाठी म्हणून कार्यरत असताना सदरची शेत मिळकत हडप करण्याचा उद्देशाने बेकायदेशीर, बोगस सातबारा उतारा तयार करून घेतला होता. सदर बनावट सातबारा उतारा तयार करून बनविण्यात आलेल्या दस्ताबाबत, महसूल विभगाच्या परिपत्रकातील तरतुदीनुसार फौजदारी कारवाई करण्याकरिता जिल्हा निबंधक कार्यालय यांचेसह नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य यांचेकडे जागरूक नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते विष्णू गायकवाड यांनी तक्रार केली होती.
यास अनुसरून, सह. जिल्हा निबंधक कार्यालय, सोलापूर यांनी, करमाळा दुय्यम निबंधक कार्यालयाला चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. यावेळी करमाळा दुय्यम निबंधक कार्यालयाकडून संबंधित लिहून घेणार आणि लिहून देणार तसेच ग्राम तलाठी यांना नोटीस काढण्यात आल्या होत्या. यावेळी प्राप्त अहवालात दस्त नोंदणी करताना जोडण्यात आलेला सातबारा उतारा हा बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्हा सरकारी अभियोक्ता, कार्यालय बार्शी यांनी सदर दस्त नोंदणी क्रमांक २४१०/२००७ मधील पक्षकारावर नोंदणी अधिनियम १९०८ मधील कलम ८२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे मत व्यक्त केले आहे त्यामुळे वरिष्ठ कर्यालाकडून गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत.
सबब सरकारतर्फे कायदेशीर फिर्यादी म्हणून तसेच प्राप्त अधिकारप्रमाणे, अरविंद सुर्यकांत कोकाटे दुय्यम निबंधक करमाळा यांचेमार्फत शोभा तानाजी खुळे रा. काकडे गल्ली, रा करमाळा, सुमतीबाई सुर्यकांत गायकवाड (सध्या मयत), पुरुषोत्तम सुर्यकांत गायकवाड, रजनीकांत सुर्यकांत गायकवाड, संजय सुर्यकांत गायकवाड हे सर्व राहणार वडाळा तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर यांचेविरुद्ध नोंदणी अधिनियम १९०८ मधील कलम ८२ प्रमाणे करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलिसांच्या पुढील तपासात सदर घटनेस अनुसरून अजून काही कलमे दाखल करणे अपेक्षित आहे.
सदर घटनेचा २०११ ते आजपर्यंत पाठपुरावा करत असल्याने, सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे, सदर प्रकरणातील आणखी काही गांभीर्य समोर येणार आहे यासाठी माझा पाठपुरावा चालू आहे. अशा घटनांमुळे महसूल प्रशासनाचे नाव बदनाम होत आहे. यामुळे महसूल विभागाने तसेच पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेवून, संबंधितावर अतिशय कठोर कारवाई करणे गरजेचे आहे जेणेकरून, असे बेकायदेशीर दस्तावेज तयार करून देणारे आणि बनावट दस्तावेज करून घेणारे यांना चांगली जरब बसेल आणि पुन्हा असे खळबळजनक प्रकार इतर कोणी करण्याचे धाडस करणार नाही – विष्णू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते महसूल विभागात फेरफार, सातबारा उतारा हे महत्त्वाचे अभिलेख आहेत तर दस्त नोंदणी ही अंतिम स्वरूप प्रदान करणारी कार्यप्रणाली आहे त्यामुळे महसूल प्रशासनाने ही कार्यपद्धती परिपूर्ण करत असताना यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळणी करणे गरजेचे आहे – संतोष कदम, माहिती अधिकार कार्यकर्ते नोंदणीकृत दस्त, व्यवहाराचा अधिकृत पुरावा असतो, त्यामुळे दस्त नोंदणी करताना जोडण्यात येणारे दस्तावेज तितकेच महत्वाचे असतात आणि हे जर बनावट किंवा बेकायदेशीर बनत असतील तर ही गंभीर बाब आहे, यासाठी वेळोवेळी महसूल दप्तर तपासणी होणे गरजेचे आहे तरच महसूल विभागातील कामकाजात पारदर्शकता येईल, सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून, सखोल चौकशी करावी – ॲडव्होकेट तुषार झेंडे-पाटील,सदस्य ग्राहक संरक्षण परिषद