आज जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल, गुंडेगाव येथे आयोजित केलेल्या विद्यार्थी पालक सभेच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासंदर्भात चर्चा अपेक्षित होती. इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे पालक असूनदेखील बहुसंख्य पालकांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना अथवा माहिती देण्यात आलेली नव्हती.शाळेत एकूण ३७५ विद्यार्थी असून देखील केवळ ८० ते ९० पालकांच्या संमतीने ही समिती स्थापन करण्यात आली, ही अत्यंत गैरप्रकाराची व नियमबाह्य कार्यवाही आहे. विद्यार्थी पालक व पत्रकार संजय भापकर जबाबदार पालक म्हणून या प्रकाराला आक्षेप घेतला असता, समितीतील काही सदस्यांनी माझ्याशी अरेरावी भाषा वापरत, अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला.
ज्ञान मिळवण्याच्या पवित्र स्थळी अशा प्रकारचा गोंधळ निर्माण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. जर एका पालकाला मत मांडण्याचा व विरोध करण्याचा अधिकार नसेल, तर मग आपल्या विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण व न्याय कसा मिळणार? हा प्रश्न सर्व संबंधितांनी आत्मपरीक्षण करून पाहण्याची वेळ आहे.शाळा ही केवळ इमारत नाही, ती पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा एकत्रित सहभागातून उभी राहणारी संस्था आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सर्वसमावेशकता आणि नियमांची अंमलबजावणी अत्यावश्यक आहे.
सदर घटनेची सखोल चौकशी व्हावी, नियमबाह्य समिती बरखास्त करण्यात यावी, व भविष्यात पालकांचा सहभाग आणि विश्वास जपणारी कार्यपद्धती स्वीकारावी, हीच अपेक्षा.