शेवगाव येथील माजी सैनिक संघाच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रॅलीमुळे संपूर्ण शहरात देशभक्तीचे वातावरण दुमदुमून गेले. “भारत माता की जय”, “वंदे मातरम” अशा घोषणा देत महाविद्यालयीन व विद्यालयीन विद्यार्थ्यांनी शहरात उत्साहात मार्च केला.या रॅलीमध्ये पद्मभूषण बाळासाहेब भारदे रेसिडेन्सी, अल आबासाहेब काकडे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान, आदर्श माध्यमिक विद्यालय, ज्ञानदीप विद्यामंदिर प्रशाळा यांसह अनेक शाळांतील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माजी सैनिक संघाचे पदाधिकारी व सदस्यही यामध्ये सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या रॅलीवर मार्गातील विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.
तहसील कार्यालयातून सुरु झालेली रॅली क्रांती चौक, बस स्थानक चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात पोहोचली. यानंतर महाविद्यालयाच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात अभिवादन व सन्मान सोहळा पार पडला.या सभेस प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे, तहसीलदार आकाश दहाडे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, गटविकास अधिकारी सोनल शहा, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रल्हाद पाठक, वन अधिकारी सचिन घनवट, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, सामाजिक कार्यकर्ते सुनील रासने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक बबनराव धावणे, कल्याणराव भागवत, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके, भाऊसाहेब अडसरे, बाळासाहेब कोकणे, कमांडर भाऊसाहेब शिंदे, माजी सैनिक संघाचे तालुकाध्यक्ष विनोद शेळके, उपाध्यक्ष शिवाजी बडे, सचिव भक्तराज केदार आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी सांगितले की, “देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणारे आजी-माजी सैनिक हे समाजाचा अनमोल ठेवा आहेत.
त्यांचा सन्मान एक दिवसापुरता मर्यादित न राहता समाजातून सातत्याने केला गेला पाहिजे. युवा पिढीनेही त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपल्या क्षेत्रात निस्वार्थीपणे प्रामाणिक सेवा देणे गरजेचे आहे.”कार्यक्रमात माजी सैनिक संजय डोंगरे, वाघोली ग्रामविकासाचे शिल्पकार उमेश भालसिंग, खामगावच्या लोकनियुक्त सरपंच विद्या अरुण बडदे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नीरज लांडे, ज्येष्ठ पत्रकार शाम पुरोहित आणि डॉ. सुनील बडे (राध्येशाम हॉस्पिटल) यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माजी सैनिक संघाचे उपाध्यक्ष शिवाजी बडे यांनी केले. अध्यक्ष विनोद शेळके यांनी आभार मानले तर दीपक कुसळकर यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमाला अनिल म्हस्के, रविंद्र काळे, नानाभाऊ पायघन, भगवान खेडकर, हरीशचंद्र शिंदे, सुरेश आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. शहरात उत्साहवर्धक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे कारगिल विजय दिनाची स्मृती जनमानसात कायमस्वरूपी कोरली गेली.