सोनई, ता. 28 ः अहिल्यानगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्यात आज सकाळी चांगलीच खळबळ उडाली. प्रसिद्ध देवस्थान शनिशिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली. सोमवारी सकाळी आठ वाजता आपल्या राहत्या घरात नितीन शेटे यांनी छताला दोर टांगून गळफास घेतला. या घटनेमुळे शनि शिंगणापूरमध्ये खळबळ उडाली. नितीन शेटे हे सध्या शनिशिंगणापूर देवस्थानाचे उप कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत होते. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. नितीन शेटे यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.
गेल्या काही दिवसांपासून शनि शिंगणापूनर देवस्थानात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरु होती. देवस्थानाचे बनावट अॅप तयार करुन पैशांची अफरातफर झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही पावसाळी अधिवेशनावेळी सभागृहात देवस्थानच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. आमदार विठ्ठल लंघे यांनी याविषयी सभागृहात लक्षवेधी उपस्थित केली होती. या पार्श्वभूमीवर नितीन शेटे यांची आत्महत्या चर्चेचा विषय ठरली आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आता या अहवालातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.