पुतळे सांगणार…संघटन शक्तीची महती… हिवरे बाजारचा नवा प्रयोग, गावाचं रुप झालंय विलोभनीय नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजार हिरवाईने नटले आहे… हरणांचे कळप उड्या मारत इकडून तिकडे धावताना दिसतात व मध्येच थांबून मान वर करून टकामका पाहताहेत….मोर पिसारे फुलवत दिमाखात फिरताहेत…त्यांच्या मंजुळ आवाजाने आसमंत प्रसन्न होतोय…गावातील तळ्यांतून ओसंडून पाणी वाहतेय…वृक्षवल्ली वार्याच्या तालात डोलताहेत….यामुळे निर्माण होत असलेली शुद्ध हवा परिसरात राहणार्या व परिसर पाहण्यास येणार्या प्रत्येकाला नवी ऊर्जा देते आहे…गावात सिमेंटचे रस्ते व त्यावरील स्वच्छता…दिल्लीच्या संसदेप्रमाणेच तयार होत असलेल्या ग्रामसंसदेच्या नव्या इमारतीचे सुरू असलेले काम…मागील 35 वर्षात गावात झालेल्या कायापालटाची अनुभूती देणारेच…नगर शहरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी नुकताच हा अनुभव घेतला व त्यांची एकच प्रतिक्रिया होती….अविस्मरणीय… स्वर्गात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघे-दोघे बसलेले…एका ठिकाणी चरख्यावर सूत कातणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व त्यांच्या समवेत हातात बंदूक घेतलेले नेताजी सुभाषचंद्र बोस…तर दुसर्या ठिकाणी राजमाता आऊसाहेब (जिजाऊ माँसाहेब) व छत्रपती शिवाजी महाराज….एकीकडे महात्माजी व नेताजींमध्ये संवाद सुरू आहे…. व दुसरीकडे आऊसाहेबांचे छत्रपती महाराजांशी हितगुज सुरू आहे…. प्रसंग पहिला ः महात्माजी म्हणतात…नेताजी तुम्ही हाती बंदूक घेऊन सशस्त्र क्रांतीची तयारी केल्याने ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र्य दिले तर नेताजी म्हणतात, नाही…महात्माजी. तुम्ही प्रत्येक देशवासियाच्या मनात ब्रिटीश सत्तेविरुद्धची ज्योत पेटवल्याने सारा देश त्यांच्या विरोधात उभा ठाकला त्यामुळे त्यांनी देश सोडला…दोघांनीही एकमेकांच्या कार्याचा केलेला तो सन्मान अनोखाच. पण नंतर दोघेही एकमेकांना विचारतात…देशाची आजची स्थिती पाहता आपण पाहिलेले स्वातंत्र्याचे स्वप्न खरेच पूर्ण झाले का…तर दोघांचे एकच उत्तर येते…देशात कोठे झाल्याचे दिसत नाही, पण आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये तर नक्कीच झालंय…तेथे स्वातंत्र्य, समता, बंधुता, आर्थिक क्षमता व सर्वांगीण विकास एकत्र नांदताना दिसताहेत…. प्रसंग दुसरा ः छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ माँसाहेबांना म्हणतात… आऊसाहेब, तुम्ही आम्हाला बालपणाचे खेळ सोडून वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घ्यायला लावली…आम्हीही हजारो सवंगडी मावळ्यांच्या साथीने दुश्मनांना पाणी पाजून राज्य स्थापन केले. पण ते स्वराज्य खरेच प्रत्यक्षात आले का…देशाची आजची स्थिती पाहता ते कोठेतरी आहे का….यावर आऊसाहेब उत्तरतात…राजे, तुमच्या हातून रोवले गेलेले सुराज्याचे रोप खर्या अर्थाने बहरले आहे ते हिवरे बाजारमध्ये…. तुम्ही स्वराज्य उभारल्यावर तुमच्या राज्यात राबवलेली जलनीती, कृषीनीती, पर्यावरण संवर्धन, आर्थिक सक्षमता, सांस्कृतिक समृद्धी…हिवरे बाजारमध्येच तंतोतंत दिसते आहे…
दोन्ही प्रसंग म्हटले तर प्रतीकात्मक. पण त्यांच्यातील संवाद नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजारने मागील 35 वर्षात दाखवलेल्या संघटन शक्तीची महती सांगणाराच व गावच्या विकासाचा मूळ पाया कशात आहे, हे स्पष्ट करणारा….हा संवाद आता हिवरे बाजारमध्ये गावाचा विकास पाहण्यास येणार्या प्रत्येकाला ऐकता येणार आहे….महात्माजी व नेताजी तसेच आऊसाहेब व छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हा संवाद ऐकवणार आहेत. हिवरे बाजारच्या विकासाचे सर्वेसर्वा पद्मश्री पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतील हा पुतळा संवाद उभारणीचे काम सध्या सुरू आहे. येत्या चार-पाच महिन्यांत तो प्रत्यक्षात आल्यावर हिवरेबाजारची यशोगाथा प्रत्यक्ष पाहताना ती राष्ट्रपुरुषांकडून ऐकण्याचे भाग्यही प्रत्येकाला लाभणार आहे. आदर्शगाव हिवरे बाजारच्या उभारणीला 35 वर्षे झाल्याने या गावाच्या विकासात योगदान देणार्या प्रत्येकाच्या हस्ते गावात सध्या वृक्षारोपण मोहीम सुरू आहे. याअंतर्गत 1850 विशेष झाडे लावली जाणार आहेत. गावात विकास कामे केलेले ठेकेदार, गावाला भेटी देणारे मान्यवर, सहकार्य करणारे प्रशासकीय अधिकारी यांना आवर्जून बोलावून बदलेले गाव दाखवले जाते व त्यांच्या हस्ते एक झाड लावले जाते…या गावच्या विकासात पत्रकारांनीही योगदान दिल्याने त्यांनाही निमंत्रण होते. त्यामुळे अहिल्यानगर शहरात विविध वृत्तपत्रांच्या संपादकीय विभागात काम करणार्या पत्रकारांनी नुकतीच कुटुंबीयांसह आदर्शगाव हिवरे बाजारला भेट दिली. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार व त्यांच्या पत्नी शोभा पवार यांनी गावच्या विकासाची माहिती दिली. यावेळी गावच्या सरपंच विमलताई ठाणगे, सोसायटीचे चेअरमन छबुराव ठाणगे, व्हा. चेअरमन रामभाऊ चत्तर, ज्येष्ठ रहिवासी सखाराम पादीर (सर), रोहिदास पादीर, अशोक गोहड, संजय पवार, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी मारुती मंदिर, पाच हजारावर पुस्तके असलेले ग्रंथालय, गावाला मिळालेल्या अनेकविध शेकडो पुरस्कारांचे दालन, गावाला भेट दिलेल्या मान्यवरांच्या अभिप्रायाची वही, तत्कालीन प्रसिद्ध निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन येणार म्हणून गावकर्यांनी श्रमदान करून एका रात्रीत तयार केलेला शेषन रस्ता, या रस्त्यावरील देवी चाणकाई माता मंदिर व त्या मंदिराच्या आवारात हापसा…जो 31 मेच्या भर उन्हाळ्यातही भरपूर पाणी देतो व त्याचा अनुभव घेण्यास त्यादिवशी अनेकजण गावात आवर्जून येतात. तुकड्या डोंगरावरील पॅगोड्यात गावाचा विकास कसा कसा होत गेला, याचे फोटो प्रदर्शन, गावात पडणार्या पावसाचा ताळेबंद मांडणारा चार्ट, राशी व नक्षत्र उद्यान पाहता पाहता आजूबाजूच्या रानात बागडणारी हरणे, पिसारे फुलवणारे मोरही पाहिले. यावेळी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी सामूदायिक वृक्षारोपणात तेथील स्मृती उद्यानात फणसाचे झाड लावले व त्यानंतर वैयक्तिकरित्याही डोंगरावर प्रत्येकाने वृक्षारोपण केले. अर्थात…हा इव्हेंट पत्रकार व कुटुंबीयांनी मस्त एन्जॉय केला…फोटो-सेल्फी-व्हीडीओमध्ये बहुतांश दंग होते व सायंकाळी बहुतेकांच्या स्टेटसवर फोटो-व्हीडीओ दिमाखात झळकतही होते. मित्र परिवार व नातलगांकडून दादही मिळवून जात होते. संवादाने भारावले सारे…. यावेळी पद्मश्री पोपटराव पवारांनी गावच्या विकासाची माहिती देताना मागील 35 वर्षात झालेला बदल ठळकपणे सांगितला. राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करणार्या कुस्तीपटूंचे गाव व्यसनांच्या विळख्यात अडकून अधोगतीकडे गेले होते. 1990मध्ये गावातील युवकांना एकत्र घेऊन गाव बदलाचा निश्चय पोपटरावांनी केला. श्रमदानातून एक हजार खड्डे खोदून त्यात चिंचेची झाडे लावली. पण अवघ्या 15 दिवसातच शेळ्या व जनावरांनी ती फस्त केली. विकासाचा पहिला धडा अपयशाचा मिळाला, पण तो मोलाचे शिकवून गेला. त्यानंतर पुन्हा खड्डे खोदून झाडे लावली व त्यांच्या संगोपनाची जबाबदारी प्रत्येकाने घेतली. लावलेल्या रोपांचे संरक्षण काट्या-कुट्यांनी केले गेले. परिणामी, ही रोपे तगली व आता त्यांचे डेरेदार वृक्ष झाले आहेत. या दरम्यानच्या काळात पाणी अडवा-पाणी जिरवा मोहिमेत डोंगरांवर समतल चर खोदून पावसाचे पाणी जिरवले गेल्याने गावातील विहिरींचे पाणी वाढले. शेतीच्या उत्पन्नात हळूहळू वाढ होऊ लागली. त्या काळात चराई बंदी, कुर्हाड बंदी, पाणी अडवा-पाणी जिरवा, नशाबंदी, वृक्षारोपण अशा पंचसूत्रीतून गावकर्यांना एकत्र केले गेले. गावातील प्रत्येक काम सामूदायिक श्रमदानानेच केले गेले. गावातील प्रत्येकाचा या कामातील सहभाग वाढवला, परिणामी, आपण आपल्या गावासाठीच करतोय, ही भावनाही रुजली. पुढे पाळीव जनावरे डोंगरावर चरायला नेण्यास बंदी घातली, झाडे तोडण्यास मनाई केली, गावात बोअरवेल घेण्यास मज्जाव केला, लोटा बंदी म्हणजे हागणदारी मुक्त गाव केले. श्रमदान ही गावाची ओळख झाली. परिणामी, गावचे रुप झपाट्याने बदलू लागले. आर्थिक समृद्धी नांदू लागली व गाव आदर्श झाल्याने देशविदेशातील अभ्यासकांचे पाय गावाकडे वळू लागले. अनेकांनी हिवरे बाजारची प्रेरणा घेऊन त्यांच्या गावी असे प्रयोग केले. अनेक ठिकाणी ते यशस्वी झाले. काही ठिकाणी स्थानिक राजकारणात ते हाणून पाडले गेले. पण हिवरे बाजार मात्र लोकसहभागातून गाव विकासाचे मॉडेल म्हणून जगभरात नावाजले गेले. गावचे सरपंच पोपटराव पवार यांना व गावाला देशविदेशातून हजारो पुरस्कार व सन्मानपत्रे मिळाली. पण, केंद्र सरकारकडून मानाचा पद्मश्री किताब मिळाल्यावर त्यांच्या कर्तृत्वावर मानाचा ठसा उमटला. उत्कृष्ट क्रिकेटपटू असलेल्या पोपटराव पवारांना क्रिकेटमध्ये धावा वा गडी बाद करण्याचे वैयक्तिक विक्रम होत असल्याचे माहीत असले तरी मूळात हा खेळ सांघिक आहे व त्यातील अंतिम यश हे वैयक्तिक विक्रमापेक्षा सांघिक एकजुटीचे असल्याची जाणीव आहे. त्यामुळे आदर्श गाव घडवल्याने देशविदेशात पोपटरावांच्या कामाला सलाम होत असला तरी याचे सारे श्रेय गावकर्यांनाच असल्याचे ते आवर्जून सांगतात. गावकर्यांच्या सांघिक कामगिरीने मागील 35 वर्षात गावाचे रुप पालटले व गावात कोणीही दारिद्-यरेषेखाली नसल्याचेही अभिमानाने सांगतात. गावाचे नाव सगळीकडेच झाल्याने केंद्र व राज्य सरकारची धोरणे ठरवणारे अधिकारी, बडे राजकीय नेते आवर्जून गावात येतात. गावच्या विकासात योगदान देण्यासाठी विविध योजनाही देतात, पण ठेकेदार मंडळी या गावातील विकास कामे करण्यास नाखूष असतात. कारण, विकास कामासाठी मंजूर झालेले सारे पैसे 100 टक्के त्याच कामावर खर्च करावे लागतात व कोणालाही टक्केवारी देता-घेता येत नाही…, अशी अनोखी नाराजी त्यांची असते. पण, नंतर अंतिम काम आपल्या हातून किती दर्जेदार झाले, या विचारातून त्यांना स्वतःलाच स्वतःचा अभिमान वाटू लागतो व हिवरे बाजारच्या लौकिकात आपलाही सहभाग झाल्याचे समाधानही लाभले. मात्र, यामुळे, गावात झालेला सिमेंटचा रस्ता 22 वर्षे झाली तरी तसाच मजबूत आहे. मध्यंतरी त्या रस्त्यातून पाईप टाकायचे होते म्हणून रस्ता थोडा खोदण्याची वेळ आली तर त्यासाठी चक्क सिमेंट ब्रेकर लावावा लागल्याचे खुद्द पवारांनीच सांगितले. संवादात बोलताना काही खंतही त्यांच्याकडून व्यक्त झाली. गावे आदर्श होतात, पण गावात राहणारी माणसे कधी आदर्श होतील…की होतील की नाही…गावा-गावात रामराज्य कधी येणार…अशी खंतही ते बोलून दाखवतात. अनेकविध बंधने गावकर्यांनी सामूदायिक निर्णय घेऊन राबवले असल्याने हे करण्यास मीच कारणीभूत असल्याच्या समजातून गावातील काहीजण पाठीमागे मला दोष देतात…शेतीत काहीजण चुकीचे उद्योग करतात…स्थापनेपासून बिनविरोध होणारी गावची ग्रामपंचायत मागच्यावेळी मात्र गाजली…निवडणूक झाली. पण तो काळ मी माझ्या परीक्षेचा मानला. आपण जे केले, ते गावाला पसंत आहे की नाही, याची प्रचिती यातून येईल, असा विचार केला. गावकर्यांनी मतदानातून पसंती दिली व पुन्हा नवी उभारी गावच्या विकासाला मिळाल्याचेही ते आवर्जून सांगतात.
विकासाचे नवे चित्र खुणावतेय गावातील शेतकर्यांनी गायी-म्हशी पालनातून दूध धंदा सुरू केला आहे. या दुधात पाणी वा अन्य कोणतीही भेसळ नसते. अगदी कसदार असलेल्या या दुधाचा आता हिवरे बाजार ब्रँड केला जाणार आहे. तो राज्यात व देशात पाठवला जाणार आहे. गावाच्या प्रवेश द्वारावर मोठी दगडी वेस बांधली गेली आहे. या वेशीसमोर लवकरच आदर्शगाव दगडी स्तंभ उभारला जाणार आहे. तेथे थुई थुई पाणी उडवणारे कारंजे असणार आहे. वेशीच्या भिंतीत करण्यात आलेल्या दोन हत्ती शिल्पांच्या सोंडेतून पडणारे पाणी या कारंजात जाऊन नंतर पुन्हा ते रिसायकल होऊन हत्ती शिल्पात येणार आहे. गावात कोणत्याही राष्ट्रपुरुषांची जयंती-पुण्यतिथी साजरी होत नाही, ग्रंथालयातच एकत्रितपणे 12 राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारले जाणार आहेत व या राष्ट्रपुरुषांवरील वा त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे त्या-त्या दिवशी ग्रामस्थांकडून वाचन करून आगळीवेगळी आदरांजली वाहिली जाणार आहे. वाढदिवसाचे वा प्रचाराचे फलक गावात कोठेही लागत नाहीत…अशा सगळ्या वातावरणात आदर्शगाव आता पुन्हा कात टाकत आहे व नव्या विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे….अहिल्यानगर जिल्ह्याला भूषणावह असलेल्या आदर्शगावाचा लौकिक भविष्यात अधिकाधिक वाढण्याचा विश्वासही यानिमित्ताने येतो आहे..
22 कोटींचे कांदे विकले… आदर्शगाव हिवरे बाजारचे क्षेत्र 976 हेक्टरचे आहे. गावची लोकसंख्या सोळाशे असून, 310 कुटुंबे गावात आहेत. गावातील सर्वच घरांवर घरातील महिलेचे नाव वरच्या बाजूला व त्या खाली घरातील कर्त्या पुरुषाचे नाव आहे. गावच्या शिवारात ऊस व केळी पिके घेण्यास बंदी आहे. कांदा हे मुख्य पीक असून, भाजीपाला व धान्य पिके घेतली जातात. यावर्षी गावातील शेतकर्यांनी चक्क 22 कोटींचा कांदा पिकवून विकला. गावच्या अर्थकारणात झपाट्याने वाढ होत आहे. 35 वर्षांपूर्वी ज्यांनी खांद्याला खांदा लावून पोपटरावांना साथ दिली, त्यांची मुले आता नव्या जोमाने पोपटरावांच्या सूचनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करीत आहेत. परिणामी, आदर्शगाव हिवरे बाजार देशभरातील गावांसाठी प्रेरणादायी झाले आहे.
पाश्चिमात्य झाडे घातक सुबाभळ, निलगिरी, ग्लिरिसिडिया ही वृक्षे पाश्चिमात्य लोकांनी आपल्याकडे आणली. ही झाडे आपल्याकडील इको सिस्टीमसाठी घातक आहेत. मात्र, ही झाडे वेगाने वाढतात. हिवरे बाजारच्या डोंगरावरही ही झाडे काही प्रमाणात आहेत. मात्र, यापुढील काळातील वृक्षारोपण प्रकल्पांतून या झाडांना वगळण्यात येणार आहे व फक्त देशी झाडेच गावच्या परिसरात लावली जाणार असल्याचे पद्मश्री पवारांनी सांगितले.