राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क: पिंपरी चिंचवड

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आज मोठी कारवाई करण्यात आली असून फरार आरोपी सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांना आज पहाटे पोलिसांनी अटक केली. हे दोघे गेल्या सात दिवसांपासून फरार होते. बावधन परिसरातून आज पहाटे 4.30 वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आले.

वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. तिच्या मृत्यूनंतर लगेचच पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक झाली होती. मात्र, सासरे आणि दीर हे सातत्याने पोलीस तपासापासून दूर राहात होते. त्यांच्या अटकेसाठी सहा स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. अखेर आज पहाटे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नात 51 तोळे सोनं, गाडी व इतर दागिने दिल्यानंतरही सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच ठेवला. किरकोळ वादातून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला, तसेच सतत मारहाण केली गेल्याचे पोस्मॉर्टेम अहवालात स्पष्ट झाले आहे.