हिवरे बाजार ग्रामस्थांनी ग्रामविकासाच्या कार्यात सातत्य राखत ‘एक वृक्ष आईसाठी, एक वृक्ष देशासाठी’ या अभिनव संकल्पनेतून १८०० देशी वृक्षांची लागवड सुरू केली असून, ही संकल्पना अद्भुत व प्रेरणादायी असल्याचे मत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी व्यक्त केले.
मातृस्मृती वनमंदिर परिसरात सुरू असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत गुरुवारी (दि. २६) उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी हिवरे बाजारच्या सातत्यपूर्ण ग्रामविकास प्रयत्नांचे कौतुक केले.पाटील म्हणाले, “१९८९ पासून पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरे बाजारने जलसंधारण, सौरऊर्जा, लोकसहभाग व पर्यावरण रक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण देशासमोर एक अनुकरणीय आदर्श उभा केला आहे.
कार्यक्रमात पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यांच्यासमवेत तहसीलदार संजय शिंदे व सौ. पाटील उपस्थित होते. ग्रामस्थांतर्फे सुधीर पाटील यांचा फेटा बांधून, शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे, व्हा. चेअरमन रामभाऊ चत्तर, सखाराम पादीर (सर), रोहिदास पादीर, अशोक गोहड, संजय पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.