सौंदाळा (ता. नेवासा) – २१ जून २०२५: मूळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालय, सोनई येथील कृषिदूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) अंतर्गत सौंदाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शाळेतील लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत योगाभ्यास केला.
कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री. घुले सर, शिक्षकवृंद व कृषिदूतांनी विद्यार्थ्यांसमवेत विविध योगासने सादर केली. सूर्यनमस्कार, ताडासन, भुजंगासन, वज्रासन, अनुलोम-विलोम यांसारख्या योगासानांचे महत्त्व व फायदे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी योगासने अत्यंत शिस्तबद्ध व आनंददायी पद्धतीने केली.या उपक्रमात कृषिदूतांनी मुलांसमोर योगप्रदर्शन करून त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचा उपयोग किती महत्त्वाचा आहे हे सांगितले. शाळेतील शिक्षकांनीही योगाबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करण्याचे महत्त्व पटवून दिले.योग दिनाच्या या कार्यक्रमास गावातील पालक, विद्यार्थी आणि नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. शाळेतील वातावरण योगमय झाले होते. लहान मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला उत्साह आणि समाधान त्यांच्या सहभागातून स्पष्टपणे दिसून येत होता.
या उपक्रमासाठी कृषिदूत भावेश बागुल, रितेश मराठे, स्नेहांशू मोहिते, प्रशांत लगड, अभिजित कदम आणि साहिल कुंभारे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य प्रा. सुनील बोरुडे, समन्वयक डॉ. अतुल दरंदले आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकृष्ण हुरुळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. योग दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, मानसिक व नैतिक आरोग्याबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण करण्यात आली.