पारनेर तालुक्यातील ख्यातनाम व ज्येष्ठ पत्रकार श्री. दत्तात्रेय बबनराव उनवणे यांना त्यांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ योगदानासाठी व निःस्वार्थ सेवेबद्दल राज्य मराठी पत्रकार संघा तर्फे जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराच्या घोषणेनंतर संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण असून निघोज ग्रामस्थांनी आणि विविध सामाजिक संस्थांनी त्यांचे जंगी स्वागत व सत्कार केला.या प्रसंगी शिवबा संघटना, जनसेवा फाउंडेशन, अल्पसंख्य समाज मंडळ निघोज तसेच अन्य अनेक संस्थांनी श्री. उनवणे यांचा विशेष सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सामाजिक, पत्रकारितेतील कार्याला मान्यता मिळाल्याने सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विशेषतः या पुरस्काराची घोषणा मा. आरोटे सर यांनी निघोज येथे येऊन औपचारिकरित्या केली. त्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांचाही मान्यतेने सत्कार करण्यात आला. ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. श्री. दत्तात्रेय उनवणे यांनी गेल्या अनेक दशकांपासून ग्रामीण भागातील समस्या, विकास कामे, शैक्षणिक व सामाजिक बाबी यावर प्रामाणिकपणे पत्रकारिता केली आहे. त्यांच्या लेखणीने अनेक प्रश्नांना वाचा फोडली असून, पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते. तालुक्याच्या सामाजिक व पत्रकारितेच्या इतिहासात हा गौरव एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून, श्री. उनवणे यांना मिळालेला हा सन्मान संपूर्ण पारनेर तालुक्याचा अभिमान आहे.