श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव ग्रामपंचायतची कोरम अभावी विठ्ठलराव सोनवणे यांनी तहकूब केलेली ग्रामसभा मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी पुन्हा घेण्यात आली. ग्रामपंचायत प्रांगणात झालेल्या या सभेला ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात लक्षणीय उपस्थिती लाभल्याने ग्रामसभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
सभेच्या प्रारंभी सरपंच सौ. सविता देवकर यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत तंटामुक्ती अध्यक्ष बाजीराव राऊत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर ग्रामसेवक प्रशांत दर्शने यांनी अजेंड्यावरील विषय मांडले. ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर राऊत यांनी मागील काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. ग्रामस्थांनी कचराकुंडी, रस्ते, आरोग्य सुविधा अशा दैनंदिन समस्यांवर तुफान प्रश्नांचा पाऊस पाडला. माजी सरपंच वनिता राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत चुकीच्या कामकाजावर थेट आरोप केले. त्यांच्या काळातील मागील एक वर्षापासून प्रलंबित असलेली स्ट्रीट लाईट कारागीर बिल, मजूर व वाहनधारकांची देणी जाणीवपूर्वक थांबवली जात असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला. ग्रामपंचायत सदस्य अक्षय राऊत यांनी वॉर्ड क्रमांक ३ मधील विकास कामांत राजकारण होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. जय मल्हार सेनेचे तालुका अध्यक्ष संजय राऊत यांनी प्रशासन व पदाधिकारी हे जनतेचे सेवक असून मालकासारखे वागू नये, अन्यथा तीव्र संघर्ष उभारला जाईल, असा इशारा दिला. पाटीलबा राऊत यांनी गावातील पेविंग ब्लॉक रस्त्याच्या बोगस कामाची चौकशी करण्याची मागणी केली. दत्तात्रय जाधव यांनी अनेक ग्रामसभेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला.
ग्रामपंचायतच्या अनेक विकासकामांवर प्रश्नचिन्ह
ग्रामपंचायतच्या घनकचऱ्याच्या व्यवस्थापनावर नईम पठाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रेल्वे अंडरग्राउंड पुलाखाली पाणी साचत असल्यामुळे अनेक महिला नागरिकांना पावसाळ्यामध्ये मोठ्या त्रासात सामोरे जावे लागत असल्याने ठेकेदाराचे बिले रोखावीत,अन्यथा त्यावर कायदेशीर कारवाई करावी असा ठराव अनिल उंडे यांनी मांडला.प्रशांत राऊत यांनी जलजीवन योजनेतील ठेकेदाराच्या गलथान कामामुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था मांडली.भागचंद नवगिरे यांनी अंगणवाडीच्या बांधकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले बाबत तक्रार केली. यानंतर विठ्ठलराव सोनवणे यांनी माईकचा ताबा घेऊन ग्रामपंचायत च्या कारभारावर ताशेरे ओढून घरकुल योजना, स्मशानभूमी सुशोभीकरण, जल जीवन योजनेतील भ्रष्टाचार, अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन,गावातील अवैध व्यवसाय, अशोकनगर पोलिस चौकी कोणाच्या आशीर्वादाने पळवली, ग्रामनिधीतून न केलेल्या कामांची बोगस बिले काढणे आदी मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना स्पष्ट शब्दात जाब विचारला. गावातील वाढत्या वर्गणीसंदर्भात स्पष्ट नियम ठरविण्याची मागणीही त्यांनी केली.यावेळी अनेक विषयावर चांगलीच खडाजंगी रंगली होती.
ग्रामसभा आटोपती प्रश्नांचा जोर वाढल्याने ग्रामसभा घाईघाईत आटोपती घेण्यात आली. काही तरुणांनी आक्षेप घेतला असता, ग्रामविकास अधिकारी दर्शने यांनी त्यांचे सर्व मुद्दे प्रोसीडिंगमध्ये घेतल्याची नोंद करून सभा समाप्त केली.
यावेळी शासनाचे उत्कृष्ट तलाठी म्हणून गौरव झालेले कामगार तलाठी अनिल शिंदे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामविकास अधिकारी प्रशांत दर्शने यांनी शांततेत कामकाज पार पाडले. सहाय्यक कृषी अधिकारी शिंदे, पोलीस पाटील चंद्रकला गायधने, उपसरपंच जगन्नाथ जाधव, पक्षपदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीरामपूर शहर पोलिस प्रशासनाने यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. ग्रामसभेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल विठ्ठलराव सोनवणे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.यावेळी अक्षय राऊत यांनी गावात मेन मेन चौकात सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी केली आहे.